कडेगांव. वार्ताहर
काँग्रेस पक्ष्याने कधीच महिला आरक्षणास विरोध केला नाही, उलट स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस मुळेच महिलांना प्रतिनिधी मिळत आहे, देशाच्या प्रमुख व संविधानिक पदावर महिलांना बसवणारी काँग्रेसच असून राष्ट्रीय पक्षाची महिला अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष करणारी सुद्धा काँग्रेसच आहे. सन २०२३ ला महिला आरक्षण विधेयकास पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता, पण आता महिला आरक्षणाच्या आडून सत्ताधाऱ्यांना ‘डिलिमिटेशनचा’ अजेंडा राबवायचा होता, ते काँग्रेस पक्षाने होवू दिले नाही असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या पलूस व कडेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित संघटन सृजन अभियान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा निरीक्षक तेलंगणाचे आमदार थोटा लक्ष्मीकांतराय, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉ.शांताराम कदम, रयत शिक्षण संस्थेचे महेंद्र लाड, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.जितेश कदम, पक्ष निरीक्षक राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ.डॉ.कदम म्हणाले, या विधेयकामुळे उत्तर भारतात २.५ टक्के खासदार संख्या वाढणार होती, २०२३ साली पास झालेल्या विधेयकानुसार २०२९ च्या निवडणूकीत राष्ट्रीय जनगणने नुसार हे आरक्षण लागू होणार होते, परंतु डिलिमिटेशनसाठी हे विधेयक लागू करण्याचा घाट सत्ताधांऱ्यानी घातला होता. संघटन सृजन ही संकल्पना काँग्रेस पक्षाने देशभर राबवली आहे. ग्रामस्तरापासून कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन पक्षाच्या पदाधिकारी निवडी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्षाने केलेल्या कामगिरी बद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना पक्ष निरीक्षक आमदार थोटा लक्ष्मीकांतराय म्हणाले, भारत देशासाठी काँग्रेस पक्षच गरजेचा आहे. काही दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी कोणी सत्तेत येईल नाटक करेल पण देशाची जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षात आहे. असे म्हणतात की मोठा चोर ओळखायला उशीर लागतो. पण आता जे काय लोकसभेत घडले त्यानंतर आता काँग्रेस पक्ष सक्षम होत आहे, काँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष असून या अभियानाच्या माध्यमातून तुमचा नेता तुम्हीच निवडणार आहे, येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्ष पदाला खूप मोठे अधिकार मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मोहिते वडगावचे माजी सरपंच विजय मोहिते, जेष्ठ नेते श्रीकांत लाड, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन प्रा.सिकंदर जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, युवा नेते हर्षवर्धन कदम, पलूसच्या नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, जेष्ठ नेते जे.के.बापू जाधव, उपसभापती डॉ.विजय महाडिक, काँग्रेसचे महासचिव इंद्रजीत साळूंखे, प्रदेश सचिव प्रणाली पाटील, माजी जिल्हाध्यक्ष मालन मोहिते, माजी सरपंच डॉ.विजय होनमाने, माजी उपसरपंच बाबासो सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष सागर सूर्यवंशी, काँग्रेस कमिटीचे सुनील जगदाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले.

